• तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना •

Scheme-image

1. बीज भांडवल योजनेचे स्वरुप :-

  1. महाराष्ट्र राज्यातील किमान दहा वर्ष वास्तव्य असलेल्या तृतीयपंथीय या घटकातील व्यक्तींना त्यांचेकडे असलेले कौशल्य व अप्रशिक्षीत व्यक्तींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांमार्फत छोट्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविण्यात येईल.
  2. प्रस्तुत योजनेतंर्गत अप्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना प्रामुख्याने शासन निर्णयात नमुद व यासारखे इतर लघु व्यवसायांसाठी या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.
  3. प्रशिक्षीत असल्यास तृतीयपंथीय लाभार्थ्यांना शासन निर्णयात नमुद व यासारख्या इतर व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे तसेच अप्रशिक्षीत तृतीयपंथीय व्यक्तींना व्यवसायाचे प्रशिक्षण विभागांमार्फत देऊन त्याकरीता आवश्यक साधने संच (Tool Kit) साठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.

2. कर्जाचे प्रकार :-

प्रस्तुत योजनेतंर्गत तृतीयपंथी लाभार्थ्यांस खालीलपैकी कोणतेही एक कर्ज अनुज्ञेय राहील.

  1. लघु कर्ज योजना रुपये २५,०००/- पर्यंत (लाभार्थी हिस्सा ५ टक्के, ४५ टक्के शासन अनुदान व ५० टक्के राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज)
  2. मध्यम कर्ज योजना- रुपये ५०,०००/- पर्यंत (लाभार्थी हिस्सा ५ टक्के, ४५ टक्के शासन अनुदान व ५० टक्के राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज)
  3. दीर्घ कर्ज योजना- रुपये २,००,०००/- पर्यंत (लाभार्थी हिस्सा ५ टक्के, ४५ टक्के शासन अनुदान व ५० टक्के राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज)

3. बीज भांडवल योजनेची वैशिष्टे :-

  1. राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे.
  2. व्यक्तींना लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन देणे.
  3. सदरची योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविली जाईल.
  4. सदर योजनेअंतर्गत तृतीयपंथीय लाभार्थ्यांसाठी कौशल्य / व्यवसाय विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल.
  5.  सदर योजनेंतर्गत लाभार्थी हिस्सा ५ टक्के, ४५ टक्के शासन अनुदान व ५० टक्के राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज, ह्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येईल. (सदर योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या कर्जावरील व्याज दर (Rate of Interest) संबंधित बँकेच्या अंतर्गत नियमन व रिझर्व्ह बँक (RBI) कडून निश्चित केलेल्या धोरणांप्रमाणे राहील.)
  6. सदर योजनेंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या लाभार्थ्यास व्याजावर ३ टक्के रिबेट (सुट) देण्यात येईल.

4. बीज भांडवल योजनेसाठी लाभार्थ्याचे पात्रता निकष :-

  1. लाभार्थी हा तृतीयपंथी व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी किमान १० वर्षे असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  2. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  3. लाभार्थी हा १८ ते ५० या वयोगटातील व्यवसाय करण्यासाठी सक्षम असावा.
  4. बीज भांडवल योजनेंतर्गत कर्जदारास कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची गरज नाही.
  5. कोणत्याही प्रकारचे तारण (मॉर्गेज) ठेवावे लागणार नाही.
  6. लाभार्थ्याने अर्ज करतेवेळी यापूर्वी इतर कोणत्याही बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  7. तृतीयपंथीय लाभार्थ्याने व्यवसायासाठी कौशल्य असल्यास नमूद करणे आवश्यक आहे.

5. बीज भांडवल योजनेंतर्गत कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-

  1. महाराष्ट्र राज्यात किमान १० वर्षे वास्तव्य केले असल्याचे अधिवास प्रमाणपत्र.
  2. सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले ओळखपत्र.
  3. वास्तवाकरिता पुरावा मतदान ओळखपत्र/आधार कार्ड/पॅनकार्ड/रेशनकार्ड/लाईट बील/घराची टॅक्स पावती/ भाडे करारपत्र इत्यादी
  4. लाभार्थी जो व्यवसाय करणार आहे किंवा करत असल्यास त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
  5. व्यवसायासाठी लागणारी सामुग्री किंवा यंत्र सामुग्री इत्यादीचे कोटेशन व बिले.
  6. व्यवसाय ज्या ठिकाणी करणार आहे त्या जागेचा ७/१२ उतारा / प्रकल्पासाठी जागा भाडे तत्वावर घेणार असल्यास भाडेकरारनामा. (परिशिष्ट-ब)
  7. व्यवसायाच्या जागेचे ठिकाण भाडेकराराने असल्यास जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र,
  8. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र.
  9. लाभार्थ्याने ज्या प्रयोजनासाठी कर्ज घेतले आहे, त्याच प्रयोजनासाठी उपयोग करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.
  10. अर्जदाराचे २ फोटो.

6. बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दती :-

तृतीयपंथीय लाभार्थ्याने शासनाने विहीत केलेल्या नमुन्यामधील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडल्याची पुर्ण खात्री करुन परिपूर्ण अर्ज सक्षम प्रधिकारी व संबंधीत जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्या कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक राहील. (विहीत नमुन्यातील अर्ज-परिशिष्ट-अ)

7. बीजभांडवल योजनेची कार्यपध्दती:-

तृतीयपंथीय लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजूर करण्याबाबत शासनामार्फत सदर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सक्षम प्राधिकारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेमार्फत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनंतर कर्ज मंजूरीबाबत बँकेस शिफारस करण्यात येईल. सदर कर्ज मंजूरी नंतर शासन अनुदानासाठी संबंधित जिल्हाचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्या शिफारशीनुसार आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्यामार्फत शासनास सादर करावेत.

8. बीज भांडवल कर्जाची परतफेड :-

तृतीयपंथीय लाभार्थ्यांना बीज भांडवल योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांकडून उपलब्ध करुन दिलेले कर्जाचे हप्ते नियमानुसार विहीत मुदतीत भरणे बंधनकारक राहील.

9.बीज भांडवल योजनेंतर्गत कर्जाची वसूली :-

तृतीयपंथीयांना बीज भांडवल योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जदारास दिलेल्या कर्जाची वसूली बँकेच्या नियमानुसार करावी. याबाबत कर्ज वसूलीस शासन कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.

10. प्रस्तुत योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने तृतीयपंथी लाभार्थ्यांकरिता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत घेण्यासाठी सविस्तर प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात येईल.

11. तृतीयपंथी घटकातील व्यक्तींना वरील मुद्दा क्र.01 मधील 03  योजनांचा बीज भांडवल योजनव्दारे लाभ देताना कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता विकास प्रशिक्षण देणे अनिवार्य राहील.

12. व्यवसायाची देण्यात आलेली यादी ही केवळ दिशादर्शक असून आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्या शिफारशीनुसार लाभार्थ्यांच्या यादीत वाढ / घट करण्याचा अधिकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास राहील.

• अर्ज करा •

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर